Wednesday, May 16, 2012

ताटकळलेला बुद्ध.


                                  ताटकळलेला बुद्ध.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.
त्याच सुमारास तेथून भगवान बुद्ध चालले होते. त्यांची नजर त्या मनुष्यप्राण्यावर पडली. त्यांनी त्यास हलवून जागे केले आणि विचारले,” बाबा रे, तू असा रिकाम्या देव्हार्यासमोर ध्यानस्थ का बरं बसला आहेस?” चकित होवून मनुष्याने पाहिले तो खरंच देव्हारा रिकामा होता.
आपण ध्यानस्थ बसलो तेव्हापासून तो तसा होता की नंतर रिकामा झाला, हे त्याला काही केल्या आठवेना,उमगेना. पण गेली हजारो वर्षे, ज्या देव्हार्याची लोकसंख्या तेहेतीस कोटी आहे याची त्याला खात्री होती, ती प्रत्यक्षात शून्य दिसलेली त्यास सहन होईना. त्याच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागले, व तो बुद्धांना म्हणाला,”भगवान, आपण माझे डोळे उघडून मला सत्य परिस्थिती चे आकलन करून दिलेत हे उपकारच झाले माझ्यावर, पण हा देव्हारा रिकामा आहे असे सत्य स्वीकारण्याची मानसिक शक्ती माझ्या ठायी नाही. तेव्हा कृपया आपण अजून एक उपकार करा माझ्यावर. हा देव्हारा रिकामा असल्याचे आपण मला दाखवलेत, त्यामुळे त्याचे रिकामपण सहन करण्याची मनःशक्ती माझ्यात निर्माण होईपर्यंत तो रिकामा राहू न देण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर येते. तेव्हा जोपावेतो मी अशी दिव्य मानसिक शक्ती मिळवत नाही, तोपर्यंत आपणच या देव्हाऱ्यात बसा. कृपा करून नाही म्हणू नका, नाहीतर दु:खातिरेकाने माझा जीव......”
करुणा हाच स्थायीभाव असलेल्या बुद्धाला त्या मनुष्यप्राण्याची दया आली. त्याचे मन मोडवेना. तेव्हा तो तसे करायला कबूल झाला व देव्हाऱ्यात जावून बसला. शक्ती मिळवण्यासाठी मनुष्य परत एकदा.....आता भरलेल्या .........देव्हाऱ्यासमोर ध्यानस्थ बसला........
वर्षे गेली......शतके गेली.......युगे गेली.........रिकामा देव्हारा सहन करायची ताकद मनुष्यांत कधी येईल, वा तो कधी ध्यान सोडून डोळे उघडून आपल्याला कृतज्ञ निरोप देईल? याची वाट पाहत भगवान बुद्ध आजही त्या देव्हाऱ्यात ताटकळत बसलेले आहेत............

No comments:

Post a Comment