Friday, May 15, 2015

The law of violence?

The law of violence?


एकूण लोकसंख्येच्या अति अति नगण्य प्रमाणात अशी काही माणसे असतात, की जी पूर्णपणे थंड डोक्याने,ठरवून मनुष्यहत्या करू शकतात.एकतर पूर्णपणे उलट्या काळजाची, विकृत गुन्हेगार माणसे हे करू शकतात, किंवा मग, यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली, आणि आपण जे करीत आहोत ते देशाच्या, समाजाच्या हिताचे आहे याची संपूर्ण खात्री असलेली....पोलीस किंवा सैनिक अशांसारखी माणसे. फ़ार फ़ार कमी लोक असे असतात, की जे, दंगलीसारख्या एखाद्या अत्यंत प्रक्षुब्ध, ज्वालाग्राही भावनेने भारलेल्या कालखंडात मनुष्यहत्त्येचं पातक करू शकतात....पण अशा लोकांना त्या कृत्याची टोचणी अगदी अखेरपर्यंत सोबत करते.
बोकड, कोंबडी इत्यादी प्राण्यांना मांसासाठी मारायचे असेल, तर केवळ मांसाहारी आहे म्हणून वाट्टेल तो माणूस हे काम करू शकणार नाही. त्यासाठी व्यावसायिक खाटिक असणे गरजेचे आहे. मोठ्या वन्य प्राण्याची शिकार करायची असेल तर अगदी व्यावसायिक खाटिक नाही, पण तरीही बरंच धाडस अंगी असावं लागतं, आणी दगडी काळीज सुद्धा. पण त्या मानाने पक्ष्यांची शिकार करणारे संख्येने जास्त आहेत. पाण्यातील मासे पकडणे हा कोळी लोकांचा व्यवसायही आहे, आणि कित्येक लोकांचा छन्दही.
घरातील उंदीर मारणे, हेसुद्धा अगदी प्रत्येकाला जमणारे काम नव्हे, त्यासाठी थोडातरी धीटपणा हवाच. पाल मारणे हे त्या मानाने सोपे, पण तरीही बहुतेकांना नकोसेच वाटणारे काम.
अती हळव्या (आणि त्यामुळे चेष्टेचा विषय बनलेल्या) माणसांचं एक सोडलं, तर बाकी बहुतेक सर्वजण, डास,मुंग्या,झुरळे इत्यादीना अगदी सहज चिरडू शकतात.
आणि मातीत उगवलेलं एखादं गवताचं पातं, एखादे शेंबडे पोर देखील सहज उपटून फेकून देते.
एखादा जीव स्वतःपेक्षा जेवढा वेगळा, तेवढा तो हिंसक रीतीने नष्ट करणं माणसाला सोपं जातं, असा काही निसर्गनियम आहे काय???


2 comments: