Saturday, January 14, 2012

उपोद्‍घात व उपसंहार

काही शब्द आपल्याला त्यांच्या अर्थामुळे तर काही त्यांच्या नादामुळे आवडतात. नादमाधुर्यामुळे मला आवडणारे हे दोन शब्द, उपोदघात व उपसंहार.उपोदघात कादंबरीच्या आधी व उपसंहार कादंबरीच्या नंतर येत असल्यामुळे मला मतितार्थ माहित होता, पण नेमका शब्दश: अर्थ माहित नव्हता. पण काही गोष्टी कशा अकस्मातपणे उलगडत जातात!
एक दिवस माझ्या कानावर ’उदघाटन’ हा शब्द पडला आणि विचारांची एक मालिकाच सुरू झाली. ’उदघाटन’ या शब्दाचा मूळ धातू असणार ’उदघात’ म्हणजे नक्कीच ’सुरुवात’ असा असणार. आणि कादंबरीची प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीचा भाग म्हणून ’उप+उद्‍घात= उपोद्‍घात’ असा उलगडा झाला. ’उपसंहार’ चा अर्थ उलगडणं त्या मानाने सोपं आहे. ’उप+संहार=उपसंहार= शेवटानंतरचा भाग’ किंवा उपशेवट!!! यामुळे एक गंमत अशी झाली की संहार चा शब्दशः अर्थ ठार मारणे असा समजला जातो, तसा नसून शेवट करणे असा आहे अशी ज्ञानात भर पडली.
या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द आहेत क्रमशः prologue व epilogue. त्यामुळे थोडा तर्क लढवून pro,epi,व logue या शब्दांचाही शब्दशः अर्थ समजला. logue म्हणजे नक्कीच लेखन, त्यामुळे log शब्द जोडलेल्या इतर शब्दांकडे गाडी वळली. logarithm=log+arithm= लिखित गणित. catalogue=cata+log=रकान्यात विभागलेले लेखन (categorised लेखन?) इत्यादी...
pro म्हणजे सुरुवात हे ओघाने आलंच.त्यामुळे proactive, promotion,procreate या शब्दांशी खेळत बसलो थोडा वेळ. पण ’लांबवणे’ याला ’prolong' का म्हणत असावेत इथे गाडी अडली आणी epi कडे मोर्चा वळवला.epi म्हणजे शेवट. लगेच आठवलं ते...epidemic! democracy शब्दामुळे demo/demi यांचा ’लोक’ या शब्दाशी संबंध आहे हा अंदाज होताच. म्हणजेच epidemic=epi+demic=लोकांचा शेवट करणारा!!! epidemic चा साथीचा रोग हा अर्थ माहीत होता, पण शब्दशः अर्थ किती भयंकर निघाला! मग epi राहिला बाजूला आणि demi शब्दानेच लक्ष वेधून घेतलं. वेतोबा, म्हसोबा इत्यादी देवांना demi-gods का म्हणतात ते समजलं. लोकदैवत!!! किती छान अर्थ!
शब्दांचे मूलशब्द आणि त्यांचे शब्दशः अर्थ शोधणं हे एक खूप मोठं शास्त्र आहे , आणि मी वर जे काही जावईशोध लावले आहेत त्यातील बरेचसे चुकिचेही असतील. पण वाचकांना शब्दार्थ सांगणे हा माझा हेतू नव्हताच मुळी! मनातल्या मनात मी जी काही कसरत केली, ज्या तार्किक कोलांट्याउड्या मारल्या, त्यातील मजा वाचकांपर्यंत पोचवणे एवढाच हेतू. ती मजा dictionary घेउन अर्थ शोधायला आली नसती.
असं वाटतं की माझ्या मनात ज्या शब्दांचे शब्दशः अर्थ उलगडत नाहियेत त्यांची एक मोठाली माळ होती, जणु काही फ़टाक्यांची माळ. ’उद्‍घाटन’ या शब्दाचे कानावर पडणे म्हणजे जणू काही ती वात पेटवली जाणे. आणि धडाधड फ़टाके फ़ुटत जावेत तसे एकेका शब्दाचे अर्थ उलगडत गेले. या माळेतील काही फ़टाके न फ़ुटलेले राहतात तसे episode,epilleptic,epicentre इत्यादी काही शब्द न उलगडता तसेच राहिले. भूकंपाला epicentre असतं, म्हणजे काय? ’शेवटचा केंद्रबिंदू’?
कुणास ठाऊक, या शब्दांचा अर्थ समजेल तेव्हा फ़टाक्यांच्या एका नव्या माळेचा ’उपोद्‍घात’ होइल कदाचित!!!

No comments:

Post a Comment